भाषा, ओळख, अस्मिता, संस्कृती, इत्यादी

शनिवार, ८ डिसेंबरला मला टाइम्स लिटररी कार्निवलमध्ये भाषेवरील परिसंवादामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाली. वक्त्यांमध्ये शांता गोखले, मृणाल पांडे आणि प्रसून जोशी अशी नावाजलेली नावे होती. परिसंवादाचा विषय होता, Losing Language, Losing Identity. आजच्या काळामध्ये ओळख हा मुद्दा महत्वाचा बनलाय, याचं मुख्य कारण म्हणजे लोकांचे स्थलांतरण. अगदी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीपर्यंत आपला समाज बर्यापैकी स्थिर होता. परंतु, औद्योगिकीकरणामुळे उत्तर भारतीयांची वाढती संख्या आणि नव्या पिढीचं उच्च शिक्षणासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये स्थलांतरित होणं यामुळे परिस्थिती बदलतेय.

असं म्हटलं जातं, कि मराठी भाषा दर काही मैलांनी बदलते. आपण अगदी भिवंडीच्या लोकांच्या (ज्यांचा उपहासाने डखणी म्हणून उल्लेख केला जातो) बोलण्याच्या पद्धतीकडे पाहिलं, तर आपल्याला आढळतं, कि ते दर दोन वाक्यानंतर बुलू हा शब्द वापरतात. तसेच, ते सर्रास ‘ड’ या अक्षराऐवजी ‘र’ हे अक्षर वापरतात. (म्हणजे ते दगडला ‘दगड’ न म्हणता ‘दगर’ म्हणतात). लग्नाच्या आदल्या रात्री जो समारंभ होतो, त्याला वाड्यामध्ये तेलं, पालघर-विक्रमगडमध्ये मांमशी, तर काही ठिकाणी हळदी म्हणतात. जव्हार-मोखाड्यामधील लोकांची भाषा तर इतर भागातील लोकांना अगदीच वेगळी वाटते.

पण खरं पाहता, हा फरक केवळ भाषेची लय आणि ढब यामध्ये आहे, भाषेमध्ये नाही आणि त्यामुळे आपल्याला एकमेकांशी संवाद साधताना कधी अडथळा आला नाही. तसेच, भाषेचा वेगळा विचार करण्याची वेळही कधी आली नाही. परंतु, हिंदी चित्रपट आणि उत्तर भारतीयांचे आपल्या भागामध्ये स्थायिक होणे, यामुळे हिंदीच्या वापराचं प्रमाण वाढलं आहे. इंग्रजीचा प्रभाव तर सगळेच जाणून आहेत. त्यामुळे, मराठी माणसाला एकाच वेळेस तीन भाषांशी जमवून घ्यावं लागत आहे.

कोणत्याही भाषेमध्ये पारंगत होण्यासाठी चार कौशल्यांची आवश्यकता असते, श्रुती (Listening), वाचा (Speaking), वाचन (Reading) आणि लेखन (Writing). यापैकी, मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे श्रुती आणि वाचा आपण लहानपणीच आत्मसात करतो. आणि त्यामुळे पुढील दोन कौशल्ये शिकणे सोपे होते. मराठी आणि हिंदीमध्ये बर्यापैकी साधर्म्य असल्यामुळे हिंदी शिकणंही अवघड जात नाही. परंतु, समस्या निर्माण होते ती इंग्रजी शिकताना.

इंग्रजी भाषा महत्वाची आहे, कारण ती आज जगाची भाषा म्हणून ओळखली जाते. इंग्रजीमुळे करीयरच्या अनेक संधी उपलब्ध होतात. इंग्रजी जाणणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते. तसेच, इंग्रजीमुळे ज्ञान मिळवण्याचे अनेक स्त्रोत उपलब्ध होतात (ज्यापैकी इंटरनेट हा सर्वात मोठा स्त्रोत म्हणता येईल). या सर्व गोष्टींमुळे भारतामध्ये आज इंग्रजीचं वर्चस्व खूप वाढलं आहे.

इंग्रजीमुळे भारतीय भाषांची वाढ खुंटण्याची शक्यता वर्तविली जाते. परंतु, ह्या मुद्द्यावर मला शांत शेळकेंनी कही वर्षांपूर्वी कालनिर्णयमध्ये लिहिलेला एक लेख आठवतो. त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, कि ज्ञानेश्वरांच्या काळातही संस्कृतच्या वर्चस्वामुळे अशीच शक्यता वर्तविली जात होती. परंतु, त्या काळातही मराठी भाषा नुसती जगलीच नाही, तर वाढलीही. कारण, ह्या काळामध्ये मराठी भाषेने अनेक संस्कृत शब्द आत्मसात केले. आज जे शब्द तत्सम म्हणून ओळखले जातात, ते शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे घेतलेले शब्द आहेत. ह्याच कारणास्तव मराठीमध्ये सर्रास होणार्या इंग्रजी शब्दांच्या वापरामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे आपली भाषा अशुद्ध होणार नाही, तर केवळ वाढेल. काळाबरोबर भाषा बदलणे हि खूप महत्वाची गोष्ट आहे.

परंतु, ह्या मुद्द्यावर वर उल्लेख केलेल्या परिसंवादामध्ये प्रसून जोशींनी केलेलं भाष्यही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ह्या नवीन शब्द आत्मसात करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपले जे मूळ भाषेतील शब्द आहेत, ते हरवता कामा नयेत. कारण, ते शब्द आपल्याला आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यास मदत करतात. जी मजा, ती मुलगी मला लाइन देतेय, ह्या वाक्यामध्ये आहे, ती she is looking at me मध्ये नाही.

भाषा हि केवळ संवाद साधण्याचं मध्यम नसते, तर ती एक संस्कृती असते. त्यामुळे, जेव्हा एक भाषा मरते, तेव्हा तिच्याबरोबर एक संस्कृतीही नाहीशी होत असते. म्हणून, भाषा जपणं आणि ती वृद्धिंगत करणं हि खूप महत्वाची गोष्ट आहे.

परंतु, केवळ आपलीच भाषा आणि आपलीच संस्कृती कवटाळत बसणे, हेही चुकीचे आहे. भाषा हे माणसाला लाभलेलं देणं आहे. एका माणसासाठी दोन किंवा तीन भाषा आत्मसात करणे खूप कठीण गोष्ट नाहीये. सध्याच्या भारतीय समाजरचनेत भाषा आणि बहुभाषीपण या मुद्द्यावर रामचंद्र गुहा आणि मृणाल पांडे यांचे लेख वाचनीय आहेत. नवीन भाषा आपल्याला एका नव्या संस्कृतीची ओळख करून देते. आपल्या विचारांचं आणि आकलनाचं क्षितीज विस्तारतं. म्हणून, प्रत्येकाने जेवढ्या भाषा शिकणं शक्य होईल, तेवढ्या जरूर शिकाव्यात.

Advertisements

One thought on “भाषा, ओळख, अस्मिता, संस्कृती, इत्यादी

Leave a Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s