दिवास्वप्ने

खरंच, स्वप्नं खूप चांगली असतात
विशेषतः जागेपणी पाहिलेली
शेवटपर्यंत साथ देतात ती आपल्याला
कारण भाबडी असतात ना ती
मृगजळाच्या मागे धावणाऱ्या हरणासारखी
जगाचे बंध नाही मानत ती
वा समाजाची ढोंगी नैतिकता
म्हणून रमतात ती
स्वप्नांतल्या बंगल्यात
रचत इमले हवेत
असं नाही कि माहित नसतं त्यांना
हवेतच विरणार आहेत हे हवामहाल
पण कळून चुकलेलं असतं त्यांना
स्वप्नांतले बंगले केव्हाही बरे
आग लागलेल्या सच्च्या झोपडीपेक्षा

चकवा

ही वाट जाते
स्मशानाकडे
जिथे देहाची राख होते
जे खरं तर खूप बरं असतं
आयुष्याच्या राख्ररांगोळीपेक्षा
किंवा जेव्हा कळतं
आयुष्य एक झाड आहे
किंवा त्या झाडावर बसलेला पारवा
अथवा त्या पारव्याचं गळालेलं पिस
स्वच्छंदी?
छे
वाऱ्याच्या मर्जीने पळणारं
कधी आकाशात
तर कधी कंत्राटदाराची BMW जिथून कधीही धावत नाही
अशा एखाद्या रस्त्यावरच्या खड्ड्यात
म्हणे आयुष्य सुंदर असतं
असेलही कदाचित
मातीच्या मडक्यासारखं
कुंभार झिजून ज्याला आकार देतो
आणि मग जे जातं कुणा श्रीमंताच्या घरी पाणी पाजायला
नी मग जातं फुटून एक दिवस
जेव्हा भरतो त्याचा घडा
कारण शेवटी ही वाट
छे
चकवाच तो
स्मशानाकडे नेणारा
आणि मर्जीही वाऱ्याची

एवढंच हवाय मला

तू चंद्र, तू वारा
तू निरभ्र आकाशातील स्वच्छंद तारा
तू मोह, तू माया
तू स्वप्न-पुष्पांच्या गलबल धारा

तू निर्बंध गंध
तू कविमनाचा पसारा
तू खळखळ उत्कट झरा
तू पहिल्या पावसानंतरची धरा

म्हणणार नाही मी यातलं काही
वाटल्यास नको म्हणूस कवी
नाही तू माझा चंद्र, ना तारा
मला फक्त “तू”च हवी

उगाच नको शब्दांचे अवडंबर
ना मृगजळी स्वप्नांचा झुला
गरजेला शब्द दोन समजुतीचे
एवढंच हवाय मला

निरागसतेच्या शोधात

चंद्र अंधुक होता
रात्र शुभ्र होती
आठव ते दिवस
भावंडं होते सोबती

आंबे कच्चे होते
कच्ची होती बोरे
केळे फक्त फळ होते
फक्त ‘मुले’ होती पोरी-पोरे

ताटात नव्हती भाजी
वा कधी भाकरी
मार्क्स अजून जन्मला नव्हता
नव्हती झाली फ्रेंच राज्यक्रांती

वंशज होतो सुदामाचा
थाट मात्र हरिश्चंद्राचा
रुपये अजूनही आणे होते
तरीही नव्हते काही उणे

मी आणि माझी पाखरे
उडण्यास मोकळं होतं आकाश
पंख स्वच्छंद होते
बुध्द्धास अजूनही होता अवकाश

चारोळ्या

चारोळी-१

का असे भेद
कोणी उच्च कोणी नीच
शेवटी काय होतं
होतात न सगळे मातीतच एक

चारोळी-२

मी तुला चांगला ओळखतो
किती ठामपणे म्हणतो मी
पण ते फक्त म्हणण्यापुरतं
कारण… मी अजून स्वतःलाच ओळखत नाही

चारोळी-३

नाही नाही म्हणता पडलो डोहात
आता बाहेर येववत नाही
मासा म्हणतो खैर नाही
घुसमट आता चुकणे नाही

चारोळी-४

करायचं खूप काही असतं
सगळंच साध्य होत नाही
पोटात खूप काही असतं
सगळंच ओठांवर येत नाही